मेळघाटातील जैतादेहीची निसर्ग शाळा
मेळघाटातील जैतादेहीची निसर्ग शाळा
मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा जैतादेही येथे 72 विद्यार्थी पारंपारिक अभ्यासक्रमासोबत नैसर्गिक अभ्यासाचे धडे गिरवत आहे. त्याला कारण म्हणजे या शाळेतील हरहुन्नरी मुख्याध्यापक गणेश जामूनकर व आदर्श शिक्षक जितेंद्र राठी व शिक्षिका शुभांगी येवले हे या विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देतात. आज या शाळेत 120 पेक्षा अधिक विविध वृक्ष प्रजातींचे सुमारे 1000 पेक्षा अधिक रोपट्यांचे वृक्षारोपण झाले आहे. यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांसह विविध पक्षी, फुलपाखरे, कीटक, सरीसृप जीव यांचीही उपस्थिती असते. येथील प्रत्येक विद्यार्थ्यांना काही रोपटे हे संगोपनासाठी दत्तक दिली जातात. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना त्या झाडांची संपूर्ण कुंडली पाठ आहे. झाडाची जात, त्याचे उपप्रकार, त्याचे उपयोग, त्यावरील निवासी पक्षी, फुलपाखरे आदींचा अभ्यास येथील विद्यार्थ्यांचा झाला आहे. नुकताच स्वर्गीय नर्तक या पक्ष्याने या शाळेला भेट दिली शिवाय या शाळेतील विविध भागात तुंबडे व झाडांवर विविध पक्ष्यांचे घरटे बघायला मिळते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या घरच्या मुलांप्रमाणे सर्व सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून येथील सर्व शिक्षक प्रयत्न करतात. गणवेशसह पिण्याच्या पाण्याच्या बॉटल, बॅग, शूज, संगणक सुविधा सह विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतात.
विद्यार्थ्यांना पार्ट्यांची मेजवानी
उन्हाळ्याच्या दिवसात साधारण परीक्षा आटपली कि हे विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह परिसरातून विविध दुर्मिळ वनस्पतीचे बीज संकलन करतात. यामुळे आज शालेय परिसरात यात शेवगा, गुग्गुळ, पुत्रंजीवा, कढई, चंदन, आवळा,हिरडा, शेंदरी, रक्तचंदन, आवळा,रिठा, बेहडा, मोह, चारोळी, अडुळसा, चारोळी, शमी, हिंगणबेट, अमलतास आदी विविधांगी वनौषधी डौलाने उभ्या आहेत. ह्या मुलांची महती पंचक्रोशीत असल्याने समाजातील विविध दानशूर व्यक्ती विविध फळे व खाद्यपदार्थ व विविध वस्तू भेट म्हणून देतात. नुकतेच चिखलदरा येथील स्ट्रॉबेरी उत्पादक गजानन शनवारे यांनी 10 किलो स्ट्रॉबेरी या विद्यार्थ्यांना भेट दिली. यापूर्वी टरबूज, खरबूज, सफरचंद, भजे, कच्चा चिवडा, रोडगे आदी विविध पदार्थांची मेजवानी या विद्यार्थ्यांना सातत्याने चाखायला मिळाली.