हिरवं सोनं – निवडुंग
हिरवं सोनं – निवडुंग
निवडुंग वनस्पती ज्याला आपण इंग्रजीतील कॅक्टस या नावाने अधिक ओळखतो. मुरमाड जमिनीवर अगदी कमी पाण्यात उगवणारी निवडुंग हि बहुतांश आपण काटेरी वनस्पती स्वरुपात बघितली आहे. मात्र पुणेस्थित बायफ विकास प्रतिष्ठानने काटेविरहीत निवडुंगाचे 1280 नावाने नवीन वाण विकसित केले आहे. बायफने मुरमाड जमिनीवर प्रयोग करत त्यांनी ह्या वाणाची उपयोगिता तपासून बघितली असता यात 11 ते 12 % पोष्टीक तत्वे , 5 ते 6 % प्रथिने, 15 -17 % तंतुमय पदार्थ आढळून आले. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम सारख्या खनिजांची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळले . जनावरांसाठी चारा म्हणून चोपड्या ( विना काटेरी) निवडुंगाचा प्रयोग यशस्वी होतो का? यासाठी अगोदर शेळी व करडूना अल्प मात्रेत हा चारा देण्यात आला. आश्चर्य असे कि या प्राण्यांना हा चारा टाकला असता आवडायला लागला व त्यापासून त्यांना कुठलाही अपाय झाला नाही.
शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय
शेतकऱ्यांसाठी निवडुंग शेती हा पूरक व्यवसाय म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो. एका एकर मध्ये 2 हजार पाने लावता येतात. 250 पाने पाच गुंठ्यावर लावली तर चार पाच जनावराचा चारा सहज होऊ शकतो. एक पानापासून 8 तुकडे करून करून त्यापासून रोपनिर्मिती होऊ शकते. निवडुंगाची नर्सरी म्हणून शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय किंवा स्वतंत्र उद्योग उभारता येतो. रोपे तयार करून विकता येते. एक पानापासून पाच ते सहा किलो चारा सहज मिळू शकतो. निवडूंग झाडापासून दोन वर्षापासून नियमित चारा मिळणे शक्य होते. निवडुंग वनस्पतीला पाणी कमी लागत असल्याने ईतर महागड्या चाऱ्याला पर्याय म्हणून हा चारा वापरता येतो.
निवडुंगाचे पाच फायदे
निवडुंग पासून माणसांसाठी चांगले ज्यूस मिळू शकते. या निवडूंगाचा वापर जनावरांसाठी चारा म्हणून करता येतो. यापासून उत्तम खतांची निर्मिती होते. फॅशन जगतातील विविध चामड्याच्या वस्तू व विविध डेकोरेटिव्ह वस्तुत निवडूंगाचा वापर होतो. शिवाय निवडुंग पासून इंधन देखील निर्माण करता येत असल्याचे डॉ. मनोज आवारे, विभाग प्रमुख पशुपोषण शास्त्र, बाएफ विकास प्रतिष्ठान पुणे यांनी सांगितले.