
..दबक्या पावलांनी आली
कॅटरीना ठरतेय मेळघाट क्विन
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने नुकताच आपला सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा केला. विस्तीर्ण व घनदाट अश्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सन 2024 मध्ये वारंवार होणाऱ्या व्याघ्र दर्शनाने पर्यटकांचे पाऊले सिमाडोह व कोलखास संकुलकडे वळत आहे. ऐन उन्हाळ्याचा दिवसात हे संकुल अनेकदा हाऊसफुल्ल बघायला मिळत आहे. कॅटरीना (कॉलरवाली) या वाघिणीच्या दबक्या पावलांनी ही किमया साधली आहे.
मध्यप्रदेश येथील मूळ निवासी असलेली कॅटरीना वाघीण सर्वप्रथम मेळघाट मध्ये फेब्रुवारी 2021 दृष्ट्रीस पडली. यापूर्वी होशंगाबाद चूर्णा येथे ती तिच्या दोन बछड्यांसह बघायला मिळाली. सातपुडा पर्वत रांगेतील बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा येथेही तिने फेरफटका मारला आहे. तापीच्या नदीच्या खोऱ्यातून प्रवास करत खंडू, खापर, गाडगा, डोलार चा भाग पिंजत सध्या तीने सिपना नदीच्या किनारी भागात आपला डेरा टाकला आहे. कॅटरीना सध्या 7 वर्षाची असून हरिसाल, सिमाडोह या रेंजमध्ये तीने आपली टेरीटोरी प्रस्थापित केली आहे. या भागातील तलई, रायपुर, चौराकुंड, खारी, कावळी गेट परिसरात ती नेहमी गस्त घालत असतांना अनेकांना तिने आपले दर्शन दिले आहे.
दोन वाघांशी नैनमटक्का
सिमाडोहनजिक पिली परिसरात पंजाब या नर वाघाचा संचार आहे. पंजाब सध्या 5 वर्षाचा गबरू जवान आहे. विशेष म्हणजे ‘पंजाब’ या नर वाघाच्या कॅटरीना सोबतच्या भेटीगाठी वाढल्या आहेत तर दुसरीकडे टुरिझम क्षेत्रात ‘ हिरो’चे संचार क्षेत्र आहे. हिरो सुद्धा 5 वर्षाच्या आसपास आहे. तो पहायला सुंदर असल्याने त्याला हिरो म्हणून मान्यता मिळाली आहे. या हिरोने सुद्धा कॅटरीना समोर हिरोपंथी केल्याचे प्रत्यक्ष दर्शीने बघितले आहे. म्हणजेच कॅटरीना एकाचवेळी पंजाब व हिरो सोबत एकाच वेळी डेट करत आहे. पूर्वी अंगकाठीने बारीक असलेली कॅटरीना सध्या डौलदार दिसत आहे. कधीकाळी मध्य प्रदेशात 2 बछड्यांची आई असलेली कॅटरीना मेळघाटमध्ये बछड्यांविना सिंगल फिरतांना दिसत आहे. पंजाब व हिरो सोबतच्या डेटिंग नंतर वन विभागातील कर्मचाऱ्यांसह वन्यजीव प्रेमींनासुद्धा कॅटरीना कधी गुड न्यूज देणार याचे वेध लागले आहे.