निसर्गाचे अनोखे दास – श्रीराम रामदासी
- निसर्गाचे अनोखे दास – श्रीराम रामदासी
सोलापूरसारख्या शहरात ज्या भागात वृक्ष नव्हते, वृक्षांमुळे पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता त्या भागात आज पक्ष्यांचा किलबिलाट बघायला मिळत आहे. ही किमया झाली वृक्षारोपणामुळे. सकाळी कदंब सारख्या वृक्षांना प्रदक्षिणा मारून त्याला नमस्कार करणे हा त्यांचा नित्यनेम. सनबर्ड व ईतर पक्ष्यांसाठी स्वतः कस्टम डिझाईन करून फिडर बनविणे. केवळ स्वतःच्या घरापुरता विचार न करता अवघे सोलापूर हेची माझे घर समजून हिरवेगार करणारे अनोखे निसर्ग पुत्र म्हणजे श्रीराम रामदासी.
श्रीराम काकांना लहानपणापासून निसर्गाचा ध्यास. वयाच्या 12 किंवा 13 व्या वर्षी कोरफड मध्ये पाणी पिण्यासाठी सनबर्ड दिसले. तेथून ते निसर्गाच्या प्रेमात पडले. सिद्धेश्वर मंदिराकडून शाळेचा रस्ता असल्याने येथूनच त्यांना प्रेरणा मिळाली. लहानपणापासून झाडे लावण्याचा छंद जोपासला. पुढे उदरनिर्वाहासाठी एस टी मध्ये कंडक्टर म्हणून नोकरी केली. आज ते सेवानिवृत्त झाले आहेत, पण एस टी ने खूप मोठा अनुभव दिला. उन्हाळ्यात प्लास्टिक बॉटल मध्ये पाणी तापत असल्याने त्याला गोणपाट (पोत्याचा कापड) गुंडाळायचे त्यामुळे 12 तास पाणी थंड रहायचे. स्वतः त्यांनी अनेकांना अश्या बॉटल तयार करून ईतर बांधवाना दिल्या. हाच फार्म्युला पक्ष्यांच्याफिडरसाठी वापरला.
श्रीराम काका घराच्या खिडकीला चिमण्यांसाठी ते माळवस्त्र ठेवतात.एकदा सनबर्ड सारखे पक्षी घराजवळ यावे म्हणून त्यांनी कान्हेरी प्रजातीतील पिवळे फुले फिडर भोवती लावली आणि आश्चर्य म्हणजे पक्षी यायला सुरुवात झाली. पुढे त्यांनी 50 प्रकारचे फिडर तयार केले. पक्ष्यांना जिथे हमखास अन्न मिळतात तेथे ते वास करतात हा निसर्गातून धडा मिळाल्याने श्रीराम काकांनी स्वतः ह्या पक्ष्यासाठी त्यांची उंची, वजन, ठेवण, पायांचे नाजूक तळवे आणि आपण फुलातून मधसदृश पाणी ओढून घेता येईल असा फिडर बनविला. हा फीडर म्हणजे टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेचं अप्रतिम उदाहरण आहे.टोमाटो केचपची रिकामी बाटली, च्यवनप्राशच्या डब्याचं झाकण, सायकलच्या ट्यूबचा तुकडा, मार्कर आणि दोन प्लॅस्टिकची फुलं यापासून सुंदर फिडर तयार केलं. जणू एखाद्या कंपनीने तयार केलेलं. अनेकांनी त्यांनी मोफत फिडर तयार करून दिले आहेत. आज सनबर्ड सह ईतर पक्षी जेंव्हा घराभोवती पिंगा घालतात तेंव्हा जीवन सार्थकी लागल्याचे ते सांगतात.
पक्ष्यांची रेलचेल
सूरवातीला म्हणावे तितके पक्षी येईनात ,आजूबाजूला झाडंच नाहीयेत. पक्षी कसे येणार? त्यामुळे त्यांनी घराजवळच्या परिसरात ताम्हण, कदंब, पळस, सुरंगी, आपटा, वरुण, करमळ, काळी निरगुडी, सीता अशोक अशी विविध झाडं लावली. काही महिन्यांत सगळीकडं हिरवाई दिसायला लागली आणि पाठोपाठ पक्षीही आले. आज सोलापूर सारख्या शहरात त्यांनी एका लाखापेक्षा अधिक झाडे लावण्यासाठी योगदान दिले आहे.