लिपस्टिक ट्रि – नैसर्गिक रंगाचे आगार
लिपस्टिक ट्रि – नैसर्गिक रंगाचे आगार (Bixa Orellana)
आज सर्वत्र होळी व धुलीवंदनचा उत्सव साजरा केला जात आहे. रंगोत्सव व मिठाई व ईतर खाद्य पदार्थला रंग देण्यासाठी सुद्धा फुले व बियांचा वापर केला जायचा. या श्रेणीतील एक वनस्पती म्हणजे शेंदरी. यालाच लिपस्टिक ट्रि या नावाने ओळखल्या जाते.यालाच हिंदीत लटकन, गुजराथी मध्ये सिंदुरी तर मराठीत सेंद्री किंवा शेंदरी या नावाने ओळखल्या जाते.
हे झाड साधारण 10 ते 12 फूट उंच आणि विस्तीर्ण असे वाढते. साधारण 50 वर्ष आयुर्मर्यादा असणाऱ्या शेंदरी ला ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान फुले येतात. याची फळे झाडावर सुकतात आणि मार्चपर्यंत तुटतात. तोपर्यंत आतील बिया पूर्णपणे वाळवल्या जातात किंवा सहजपणे काढल्या जाऊ शकतात. शेंगाच्या आत अंदाजे 50 बिया वाढतात. या बियांच्या बाहेरील भागात भरपूर केशरी रंग असतो, जो हातावर सहज घासता येतो. हा रंग पूर्णपणे नैसर्गिक आणि बिनविषारी आहे, त्यामुळे जगभरातील अनेक दुग्धजन्य पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. बर्फी, बासुंदी, जिलेबी, शिरा अशा अनेक मिठाई याचा वापर केल्या जातो. या बियांवर प्रक्रिया करून नारिंगी-पिवळी रंगद्रव्ये, बिक्सिन आणि नॉरबिक्सिन (कॅरेटिनॉइड्स), अन्न, सौंदर्य प्रसाधने आणि साबण उद्योगांसाठी रंग म्हणून प्राप्त केली जातात. नैसर्गिक लिपस्टिक मधे यांचा वापर केला जातो त्यामुळे यास ‘लिपस्टिक ट्री’ असेही म्हटले जाते. लिपस्टिकचे झाड मूळचे उष्णकटिबंधीय अमेरिकेचे आहे, परंतु फार पूर्वीपासून संपूर्ण उष्णकटिबंधीय जगामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. नैसर्गिक शेंदूर याच झाडापासून तयार होत असल्याने याचे नाव शेंदरी पडले असावे. कातडे कमावणाऱ्या व्यवसायात यांच्या सालीचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी स्त्रिया सिंदूर साठी याचा वापर करत असत त्यामुळे हे झाड ‘कुंकुम वृक्ष’ म्हणूनही ओळखले जाते.