रविवारला होणार थोडी हटके परीक्षा
काका-काकू मामा-मामी सह आजी आजोबा देणार परीक्षा
रविवार म्हटले स्पर्धा परीक्षेचा राखीव वार. दिनांक १७ मार्च २०२४ च्या रविवारला सुद्धा एक परीक्षा होत आहे. पण हि परीक्षा जरा हटके आहे. कारण यात १५ वर्षावरील असाक्षर काका-काकू, मामा मामी सह आजी-आजोबा एकत्रितपणे आपल्या गावातील शाळेत परीक्षा देणार आहे. प्रथमच घरातील चिमुकले ज्येष्ठांना परीक्षा केंद्रावर सोडून देऊन त्यांना बेस्ट ऑफ लक करणार आहे. सध्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या काळात हि परीक्षा होत असल्याने जेष्ठांना सुद्धा टेन्शन आले आहे.
केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी दिनांक १७ मार्च २०२४ रोजी देशातील अनेक राज्यात होऊ घातली आहे. राज्यात आतापर्यंत सहा लक्ष वीस हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्रशासनाकडे झाली असून त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश आहे. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसीत करता येतील.
या कार्यक्रमात उल्लास ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार १७ मार्च २०२४ रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्रशासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे.
नोंदणीकृत असाक्षरांनी रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी त्या शाळेमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. तसेच सदर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना) कडून करण्यात आले आहे.
परीक्षेसाठी महत्वाची कागदपत्र :-
परीक्षेस जाताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो असावा यासह जन्मतारखेचा पुरावा मतदान ओळखपत्र/ आधारकार्ड / पॅनकार्ड / बँक पासबुक इत्यादीपैकी कोणतेही एक ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
अशी असणार परीक्षा :-
हि परीक्षा १५० गुणांची होणार असून यामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानवर भर राहणार आहे. यात वाचनावर आधारित ५० गुण, लेखनावर ५० गुण व संख्याज्ञान वर आधारित ५० गुण राहणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण)अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता मिळू शकतील.परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता मिळणार नाहीत.
हि राहणार परीक्षेची वेळ :-
या परीक्षेची वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत राहणार असून प्रत्यक्ष पेपर कालावधी ३ तासांचा असेल. दिव्यांग व्यक्ती असल्यास ३० मिनिटे अधिक मिळणार आहे. उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापर करता येणार आहे.
खेळीमेळीच्या वातावरणात होणार परीक्षा :-
हि परीक्षा मार्च महिन्यात होत असली तरी परीक्षार्थी जेष्ठ असल्याने त्यांचे मनात कुठलेही टेन्शन येऊ नये याकरिता परीक्षा केंद्रावर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण ठेवण्याची जबाबदारी पर्यवेक्षकीय यंत्रणेवर राहणार आहे. म्हणजे परीक्षा शिस्तबध्द पध्दतीने घेण्यात येत असली तरी परीक्षार्थीसाठी वातावरण खेळकर असावे. जेणकरुन परीक्षार्थीवर कसल्याही प्रकारचा ताण येणार नाही. अशाही सूचना सर्व क्षेत्रीय अधिका-यांना योजना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत.
यांच्याकरिता धोक्याची घंटा :-
परीक्षा आनंददायी व उत्साहाच्या वातावरणात होत असल्याने परीक्षार्थीने चिंतामुक्त होऊन खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा द्यायची आहे, परंतु यादरम्यान परीक्षा कामकाजात अडथळे आणनाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना योजना संचालनालयाने केंद्रसंचालकांना दिल्या आहेत. त्यामुळे नातलग किंवा मित्रपरिवार यांनी परीक्षा केंद्र पासून चार हात दूर राहणे केंव्हावी चांगले. तसेच परीक्षा कामकाजात कूचराई करणारांवरही विविध नियमांखाली कारवाई होणार आहे.
सर्व परीक्षार्थींना खेळीमेळीच्या वातावरणात होत असलेल्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.