लहरीबाई – मिलेटसची ब्रान्ड एँबेसडर
लहरीबाई – मिलेटसची ब्रान्ड एँबेसडर
लहरीबाई ही मध्यप्रदेशातील सिलपाडी गावातील आदिवासी जमातीतील महिला एका वेगळ्या कारणाने जगासमोर प्रकाशझोतात आली आहे. लहरीबाई आपल्या आई वडीलसह दोन खोल्यांच्या घरात राहते. त्यांच्या या छोट्याश्या घरात एका खोलीत स्वयंपाकघर व राहण्याचा वावर असून दुसऱ्या खोलीत तिने सीड बँक उभारली आहे. यात कोडो, कुटकी, सानवा, मढिया, ज्वारी,रागी, चीना,कूटटू,साल्हार आणि काग यासह बाजरीच्या 150 हून अधिक दुर्मिळ बिया जतन केल्या आहेत. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यानी हि बीजबँक उभारली आहे. त्यांच्या या कार्याची दखल दिंडोरी चे जिल्हाधिकारी यांनी घेत त्यांना मिलेटसची (भरडधान्य) ब्रान्ड एँबेसडर म्हणून घोषित केले आहे.
लहरीबाई या बिया तिच्या जमिनीवर उगवतात, त्यानंतर त्यांना मिळालेल्या बिया त्यांच्या गावातील आणि शेजारच्या १५ गावांतील शेतकऱ्यांना वाटून देतात. त्या मोफत या बियाणे वाटण्याचे काम करतात, पण काही वेळा शेतकरी तिला त्यांच्या पिकाचा काही भाग मोबदला म्हणून देतात. युनेस्को ने २०२३ वर्ष मिलेट वर्ष म्हणून घोषित केले. लहरीबाईला त्यांच्या पूर्वजांकडून कडधान्य विषयक माहिती प्राप्त झाली आहे.आपल्या आई वडील व आजोबाच्या सानिध्यातून भरड धान्य कसे उगवायचे, त्याचे महत्व आदींची माहिती अनुभवातून प्राप्त केली आहे. या धान्यामुळे मानवाची प्रकृती सुदृढ राहत असून दीर्घ आयुष्य प्राप्त होते. हे एक प्रकारचे सुपर फूड असून अनेकांना ते मिळावे म्हणून गत १० वर्षात त्यांनी परिसरात पायपीट करून बीज संकलन केले शिवाय ते लोकांना मोफत वाटत त्याबाबत जनजागृतीचे कार्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लहरीबाई बाबत ट्वीत करत त्यांचे अभिनंदन करत अन्न धान्याच्या क्षेत्रात लहरीबाईचे कार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.लहरीबाईच्या कार्याचे दखल घेत त्यांना स्वातंत्र्यदिनाला झेंडावंदनाचा मान दिला व स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांचा फोटो लावत मोठा सन्मान दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती दौप्रदी मुर्मु यांचे हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.