मधाची चाहती – अस्वल
जंगलातील पहाड पट्ट्यातील कपार हे अस्वलीचे निवासाचे हक्काचे ठिकाण. अस्वल हा प्राणी निशाचर असल्याने भक्ष्य मिळविण्यासाठी ते सायंकाळनंतर संचार करतात. फळे, फुले, कीटक, मध ,मासे आणि कधीकधी कुजके मांस हे भारतीय अस्वलाचे खाद्य आहे. मधाचे पोळ हे अस्वलीचा विक पॉइंट असल्याने सहज कितीही मोठ्या झाडावर चढून मधाने भरलेले पोळे ते खाली पाडते आणि मध खाते. यासह वाळवी हा ब्रेकफास्ट मधील आवडीचा मेन्यू. यासाठी कितीतरी वारुळातील वाळवी ते फस्त करतात. अस्वलांना मासे खाणे पसंद असल्याने ते नदीकिनारी भागात चक्कर मारतात. मोठ्या शिताफीने ते नदीच्या प्रवाहातील मासे पकडतात. माणसाप्रमाणे अस्वलसुद्धा झोपेत मोठ्याने घोरते.
अस्वले कळपाने न राहता एकेकटी राहतात. त्यांच्या मिलनकाळ उन्हाळा असून सात ते नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर डिसेंबर-जानेवारीत मादीला १ किंवा २ पिल्ले होतात. ती दोन-तीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून बाहेर जाऊ लागतात. साधारण तीन वर्षांपर्यंत पिल्ले आईबरोबरच असतात. आईच या पिलांचे संरक्षण करते.पक्ष्यांमधील सारस च्या जोडीदारप्रमाणे अस्वल प्रजातीत सुद्धा एकनिष्ठता दिसून येते. त्यांचे आयुष्य सरासरी ३५ ते ४० वर्ष असून वजन १०० किलोपर्यंत राहते. उत्तर ध्रुवीय पांढरे अस्वल देखणे असते. सर्व जातींतील अस्वलांच्या तुलनेत हे आकाराने मोठे असून त्यांचे वजन सुमारे दीडशे किलोपर्यंत असते. उत्तर ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशात वनस्पतिजन्य पदार्थ खायला मिळत नसल्यामुळे ते मांसाहारी बनले आहे. सील आणि वॉलरस यांची पिल्ले त्याचे मुख्य भक्ष्य होय; परंतु कॅरिबू, खोकड, पक्षी आणि इतर प्राणीही ते खातात. ते उत्तम स्विमर असतात. इतिहासपूर्व काळापासून माणसाने अस्वलांची मांस, हाडे, चामडी आणि चरबी मिळविण्यासाठी हत्या केलेली आहे; तर प्राचीन काळात त्यांची नखे आणि सुळे यांपासून दागिने तयार केले जात. त्यांच्या काही जाती नामशेष झाल्या आहेत. पूर्वी दरवेशी अस्वल पाळून त्याचा खेळ करायचे मात्र वन्यजीव कायद्याने त्यावर बंदी घातली आहे. हा प्राणी जागतिक वन्य जीव निधी या जगन्मान्य संस्थेचे बोधचिन्ह आहे.