शाळांना मिळणार तब्बल 66 कोटींचे बंफर बक्षीस
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाची चित्ररथाद्वारे जनजागृती

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाची चित्ररथाद्वारे जनजागृती
प्रथम क्रमांकाच्या शाळेला 86 लाखाचे बक्षीस, अभियानसाठी 87 कोटींचे बजेट
राज्यात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी शाळा निर्माण व्हाव्या म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविले जात आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श योजनेअंतर्गत हे अभियान दिनांक 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान राबविले जात आहे. अमरावती जिल्ह्यात या अभियानाची जनजागृती करण्यासाठी समग्र शिक्षा शिक्षण विभागच्या वतीने जिल्ह्याभरात चित्ररथ फिरणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी सांगितले.
शाळांमध्ये स्पर्धा निर्माण करून शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, चांगले आरोग्य, कौशल्य विकास, राष्ट्रीय एकात्मता,व्यवसाय शिक्षण तसेच कला-क्रीडा गुणांचा विकास होण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे.
अमरावती जिल्ह्याच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या औचीत्यावर शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांच्या हस्ते या चित्ररथाला हिरवी झेंडी देण्यात आली. या रथावर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान,महावाचन उत्सव, दिव्यांग शिक्षण,पी.एम.श्री शाळा योजना बाबत माहिती दिली आहे. सोमवार ते शुक्रवार जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हा चित्ररथ फिरून शाळाशाळांत जनजागृती करणार आहे.
सुंदर शाळा अभियानाची व्याप्ती :-
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या सर्व शाळा या अभियानात सहभागी होऊ शकतात. हे अभियान दोन स्तरात विभागले असून पहिला स्तरात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, दुसऱ्या स्तरात उर्वरित ईतर सर्व व्यवस्थापन शाळांचा समावेश आहे. तसेच सदर अभियान हे मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र , वर्ग अ व वर्ग ब दर्जाच्या महानगरपालिका क्षेत्र, तर उर्वरित महाराष्ट्र अश्या तीन स्तरात विभागणी केली आहे.
असे राहणार गुणदान :-
हे अभियान एकूण 100 गुणात विभागले असून यात विद्यार्थी केंद्रित उपक्रम साठी 60 गुण तर शाळा व्यवस्थापन उपक्रम व सहभाग करीता 40 गुण राहणार आहे. विद्यार्थी केंद्रित उपक्रमात शाळा व परिसर सौंदर्यीकरण साठी 10 गुण, विविध उपक्रमातील सहभाग, व्यवस्थापन व निर्णय प्रक्रिया सहभाग साठी 15 गुण, अवांतर उपक्रम 10 गुण, इमारत व परिसर स्वच्छतासाठी 10 गुण तर राष्ट्रीय उपक्रमांना चालना देणारे उपक्रम साठी 5 गुण तर विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन साठी 10 गुण राहणार आहे. तसेच आरोग्य साठी 15 गुण, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास साठी 10 गुण, बाह्य संस्था व व्यक्ती सहकार्य साठी 5 गुण, तंबाखू मुक्त शाळा करीता 5 गुण तर ईतर विद्यार्थी केंद्रित उपक्रमासाठी 5 गुण असे एकूण 40 गुण शाळा व्यवस्थापन समिती सहभाग करीता दिलेले आहे.
असे राहणार बक्षिसे :-
यामध्ये तालुकास्तरीय प्रथम बक्षीस 3 लक्ष रुपये, द्वितीय 2 लक्ष तर तृतीय बक्षीस 1 लक्ष रुपये राहणार आहे. जिल्हास्तरासाठी प्रथम प्रथम बक्षीस 11 लक्ष रुपये, द्वितीय 5 लक्ष तर तृतीय बक्षीस 3 लक्ष रुपये राहणार आहे. विभागस्तरासाठी प्रथम बक्षीस 21 लक्ष रुपये, द्वितीय 11 लक्ष तर तृतीय बक्षीस 7 लक्ष रुपये राहणार आहे. तर राज्य स्तरासाठी प्रथम बक्षीस 51 लक्ष रुपये, द्वितीय 21 लक्ष तर तृतीय बक्षीस 11 लक्ष रुपये राहणार आहे. या अभियान अंतर्गत बक्षीसासाठी एकूण 6610 लक्ष रुपयाची तरतूद केली असून प्रचार,प्रसार,प्रवासखर्च, ईतर कार्यक्रम साठी 2063 लक्ष रुपये असे एकूण 8673 लक्ष रुपयांची तरतूद शासनातर्फे केली आहे.
..तर एका शाळेला मिळणार 86 लाख
या स्पर्धेत एखादी शाळा तालुकास्तरावर प्रथम क्रमांकसाठी पात्र ठरल्यास 3 लक्ष, तीच शाळा जिल्हास्तरावर प्रथम आल्यास 11 लक्ष ,विभाग स्तरासाठी 21 आणि तीच शाळा राज्यस्तरावर यशस्वी ठरल्यास राज्याचे प्रथम बक्षीस 51 लक्ष असे सर्व मिळून एकूण 86 लक्ष रुपये बक्षिसाची मानकरी ठरू शकतात. प्रथमच शाळांसाठी एवढ्या मोठ्या बक्षिसाची हि स्पर्धा असून अमरावती विभागातील प्रत्येक शाळेने यात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक डॉ.शिवलिंग पटवे यांनी केले.