२०२४-२५ या नवीन शैक्षणिक वर्षात सर्व शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत सर्व शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी चे विद्यार्थी एकाच रंगाच्या गणवेशात दिसणार आहे. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एका रंगाच्या दोन गणवेशाचा लाभ घेण्याचा निर्णय आज दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आला.
जून महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र शाळा सुरु होतात. सर्व शासकीय शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. यामध्ये सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. दिनांक ६ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार दारिद्यरेषेवरील पालकांच्या मुलांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी या गणवेशाचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.
गणवेशाची रचना :
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत एका विद्यार्थ्यांना दोन गणवेश खरेदी करण्याकरिता शाळांना अनुदान दिल्या जाते. नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील इ.१ ली ते इ.४ थी पर्यंतच्या मुलींकरीता पिनो फाँक, इ.५ वी ते इ.७ थी पर्यंतच्या मुलींकरीता शर्ट व स्कर्ट आणि इ. ८ वी मधील मुलींकरीता सलवार-कमीज व ओढणी तसेच, इ.१ ली ते इ.७ वी पर्यंतच्या मुलांकरीता हाफ पॅट व हाफ शर्ट व इ.८ वी मधील मुलांकरीता फुल पेंट व हाफ शर्ट याप्रमाणे गणवेशाची रचना राहणार आहे. स्थानिक महिला बचत गटांच्या मार्फत हा गणवेश शिलाई करून मिळणार आहे.
असा राहणार गणवेश :
सदर गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप राहणार असून मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट राहणार आहे, तर मुलींसाठी आकाशी रंगांचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा सलवार कमीज राहणार असल्याचे सुचविले आहे .त्यापैकी एका गणवेशावर शोल्डर स्ट्रीप व दोन खिसे राहणार आहे.