जीवघेणा मांजा
जीवघेणा मांजा
तीळसंक्रांत काळात आकाशात रंगीबेरंगी पतंग उडतांना बघायला मिळतात. याकाळात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असल्याने लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पतंगा उडवितात. पूर्वी आनंदाचा असलेला हा उत्सव आता अनेकांच्या आयुष्याचा बेरंग करत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पतंगाचा बदललेला धागा. सुरुवातीच्या काळात सुती धागा वापरल्या जायचा आता त्याऐवजी अवैधपणे मांजाचा वापर केला जातो.
नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन पद्धतीने कोणत्याही धाग्यांची निर्मिती होते. नैसर्गिक पद्धतीने अर्थात, कापसापासून अथवा वनस्पती, कीटक यापासून तयार केलेल्या धाग्यांचे आयुष्यमान ठरलेले असते. पतंगोत्सवात याच धाग्यांचा वापर पूर्वी होत होता. मात्र, काही तरी नवीन करण्याच्या नादात पतंग उडविणारे कृत्रिम धाग्यांकडे ओढले गेले. आठ दहा वर्षांपासून या कृत्रिम अर्थात नायलॉन मांजाचे चलन वाढले. नायलॉन म्हणजे प्लास्टिकपासून तयार होणारा धागा. हा धागा कुजत नाही अन् सहज तुटतही नाही. या कृत्रिम धाग्यासाठी पॉलिअमाइड, पॉलिएक्रिलोनायट्राइल, पॉलिएस्टर, पॉलिएथिलिन, पॉलिव्हिनिल क्लोराइड, पॉलिव्हिनिल अल्कोहोल, कोपॉलिमर, पॉलिप्रोपिलिन अशा रसायनांचा वापर होतो. अर्थात, या मजबूत धाग्यांचा वापर मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यांसाठी होत असतो. नायलॉनाच्या खालोखाल पॉलिव्हिनिल क्लोराइडच्या धाग्याचा उपयोग होतो. यालाच प्लास्टिक म्हणतात व यापासून मोनोफिलामेंट म्हणजे बिनपिळाचा धागा तयार होतो. औद्योगिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या धाग्यांचे महत्त्व मोठे असून, त्यांची निर्मिती करणारे अनेक छोटे-मोठे कारखाने देशभरात पसरले आहेत. या कारखान्यांचा हेतू वेगळा असला, तरी संक्रांतीदरम्यान नायलॉन मांजाचा, तसेच चिनी बनावटीच्य प्लास्टिक मांजाचा वापर केला जातो.
लोक अनेकदा छतावरून पतंग उडवतात, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. काही ठिकाणी पतंगबाज आजूबाजूला लक्ष न देता पतंग कापण्यासाठी पाठलाग करतात, त्यामुळे अपघातही होतात. मोटारसायकलस्वार आणि इतरांचा मांजाने गळा कापल्याच्या घटना वृत्त पत्रांतून वरचेवर वाचायला मिळतात. पक्ष्यांसाठी हा मांजा जीवघेणा ठरत आहे.
मांजावर बंदी – पतंग उडविताना मांजा वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अनेकदा या संदर्भात पोलिसांमार्फत कार्यवाही केल्या जाते. त्यामुळे तुम्ही आम्ही असा जीवघेणा मांजा ऐवजी पारंपारिक धागा वापरणे केंव्हाही फायदेशीर आहे.