शुगर नियंत्रक – मेथी
शुगर नियंत्रक मेथी
ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. मेथी ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात. मेथीला कडवट चव असते. मेथीमध्ये नियासिन, पोटॅशियम, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, लोह इत्यादी समृद्ध असतात.
नेहमीच्या जेवणात मेथीची पालेभाजी, मसाले व विविध फोडणी, लोणचे यात मेथी दाणे व औषधांत मेथीची पाने व बियांचा सर्वत्र वापर होतो. मेथी एकाच वेळी बल्य, स्निग्ध व वातनाशक आहे. मेथीची पाने शीत गुणाची, पित्तशामक व पाचक आहेत. पित्तप्रकृती व्यक्तींच्या तीव्र मलावरोध विकारात मेथीची भाजी दिल्यामुळे लगेचच पोट साफ होते. रक्तमिश्रित आव विकारात मेथीच्या भाजीमुळे रक्त पडणे कमी होते. बाळंतीण बाईला मेथीच्या बियांचे लाडू दिल्यास भूक चांगली लागते. जखमावर मेथीच्या बियांचा लेप लावला तर जखमा चिघळत नाही.
काही विशिष्ट प्रकारच्या लोणच्यांत, विशेषतः कैरी, लिंबू लोणच्यात मेथीदाण्यांची फोडणी दिल्याने लोणची खूप चवदार होतात. जगभर मधुमेह या विकाराचे आक्रमण मानवी जीवनावर खूप वाढते आहे. मधुमेहग्रस्त रुग्णाच्या आहारात विविध माध्यमातून मेथीचा समावेश केल्यास खात्रीने रक्तशर्करा नियंत्रणात राहत असल्याचे तज्ञांचे मत आहे. काही ठिकाणी आयुर्वेदिक औषधात मेथीचा वापर केला जातो. मेथीची भाजी उंधियो या गुजराथी पदार्थात वापरली जातात. मेथीची पाने कणकेत मिसळून पराठे, ठेपले,आणि धपाटे असे पदार्थ केले जातात. मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे.हिवाळ्याच्या दिवसात सुकामेव्याच्या लाडू प्रमाणे मेथीचे लाडू बनविले जातात. मेथीमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. मेथीच्या औषधी गुणधर्मांमुळे, हाडे आणि सांधे यांना आवश्यक पोषक मिळतात, ज्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत राहू शकतात.