व्यक्ति विशेष

निसर्ग पुजारी – शिवशंकर चापुले

लहानपणापासून निसर्गातील धबधबे, रानफुले, पक्षी प्राणी बघण्याची आवड होती. घरची परिस्थिती अगदी जेमतेम असल्याने अर्थार्जनाची जबाबदारी कमी वयात अंगाखाद्यावर पडली. त्यामुळे आवडीला सवड व शिक्षण सुद्धा मनासारखे घेता आले नाही. थोडे मोठे झाल्यावर एका सिलेंडर कंपनी मध्ये काम करत असतांना सहज सोशल मिडिया स्क्रोल करण्याची सवय जडली. एकदा सहज फेसबुकवर एका नवख्या वनस्पतीचा फोटो काढून तो शेयर करत ती वनस्पती कोणती ? असा प्रश्न विचारला..नि तेथून निसर्गातील दुर्लभ वनस्पतीच्या अभ्यासाची सवय जडली… आणि या अभ्यासातून ते आता दुर्मिळातील दुर्मिळ वनस्पती सुद्धा सहज ओळखतात. सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करणाऱ्या निसर्ग पुजारी म्हणजे शिवशंकर चापुले.

रेणापूर (जि.लातूर) येथील रहिवासी असलेल्या शिवशंकर यांनी वनस्पती जगतात आगळीवेगळी ओळख निर्माण केली. एखाद्या एम.एस.सी. झालेल्या व्यक्तीला वनस्पतींची जेवढी माहिती नसेल तेवढी माहिती शिवशंकर भाऊंना मुखोद्गत आहे. सातारा येथील धनंजय गुत्ते या पक्षिमित्रमुळे जंगल भ्रमंती वाढली. त्यांच्यामुळे पक्षी, फुलपाखरू त्यांचा जीवनक्रम कळला. कोणता पक्षी कोणत्या वनस्पतीवर घरटी करतो हे अभ्यासातून कळू लागले. त्यांनतर त्यांचा परिचय वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरधारी यांचेशी झाली. पुढे हि मैत्रीची विन अधिक घट्ट झाली. त्यांच्यासोबत दुर्मिळ वनस्पतीच्या बिया जमा करणे, त्यातून रोपटे लावणे हा छंद जडला. एक एक करता करता ७५ प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतीच्या बिया जमा केल्या. पूर्वीच्या पिढीतील लोकं हे सुमारे शंभर वर्ष पेक्षा अधिक जगायचे नंतरच्या पिढीतील लोकं जेमतेम सत्तर ते ऐंशी जगू लागले आता तर परिस्थिती आणखी बिकट होत आहे. याचे कारण म्हणजे पिढी निसर्गापासून दूर जात आहे. शिवाय प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, कार्बन उत्सर्जनमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. जर व्यक्तीची आयुर्मर्यादा वाढवायची असेल तर पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात जायला हवे. निसर्गाचे संवर्धन करणे हि काळाची गरज आहे यासाठी देशी प्रजातीचे वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी भाऊंनी निसर्गाला तनमनधनाने अर्पण केले आहे.

  प्रसिद्ध सिने अभिनेता सयाजी शिंदे सातारा दौर्यावर असतांना त्यांना शिवशंकर भाऊंच्या निसर्गकार्याची माहिती झाली, तेंव्हा त्यांनी शिवशंकरची आवर्जून भेट घेतली.  त्यांनी पूर्ण वेळ निसर्गासाठी काम करणार का ? हवे तर उदरनिर्वाह साठी आर्थिक सहकार्याची हमी आमची असे म्हणत आपलेसे केले. कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न सुटला. आता पूर्णवेळ निसर्गासाठी झोकून देत काम सुरु झाले. पुढे आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या  सामाजिक संघटनासोबत  नर्सरी विकासाचे काम स्वीकारले. गरजा कमी असल्याने निस्वार्थपणे निसर्गाची सेवा सुरूच होती. याच दरम्यान टीव्ही चॅनेल द्वारा त्यांचे काम अनेकांना माहिती होऊ लागले. याच काळात धनंजय शिरभाळे मित्राच्या माध्यमातून देवराईचे संस्थापक रघुनाथजी ढोले यांचेशी ओळख झाली. देवराईसाठी सुद्धा शिवशंकर चापुले यांनी मोलाची भूमिका बजावली.

टिनाच्या घरात बीजबँक

जेमतेम टिनाच्या घरात वास्तव्य करणाऱ्या  शिवशंकरभाऊनी निसर्गातील दुर्मिळ वनस्पतीच्या बियाण्यांची बीजबँक उभारली आहे. यात १९० प्रजातीपेक्षा अधिक देशी वान बियाण्यांचे संकलन केले आहे. ज्यात पिवळा पळस, अंजान, दही पळस, पांढरा पांगारा,अंबाडा, सोनसावर, कुंती, चेर, निर्मिली, तांबडा कुडा आदी बियांचा समावेश आहे.  ते दुर्मिळ वनस्पतीच्या बिया निशुल्क स्वरुपात महाराष्ट्रभरातील  निसर्ग प्रेमी पर्यंत पोहोचवितात. निसर्गातील अभ्यासाचा खजिना केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता  शाळा, महाविद्यालयातील युवकांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून वाटत फिरतात. विशेष म्हणजे याकरिता कुठलेही मानधन व तिकिटाचा खर्च न मागता निसर्ग सेवा म्हणून युवकांमध्ये जनजागृती करत आहे. नुकताच त्यांनी मेळघाट जंगलातील भ्रमंती करत येथील दुर्मिळ वनस्पतीचा अभ्यासदौरा केला आहे. त्यांच्या या अभ्यास दौऱ्यानंतर सयाजी शिंदे यांनी सुद्धा दिनांक ३ जानेवारी रोजी त्यांच्या घरी आकस्मिक भेट त्यांना नववर्षाची भेट दिली आहे. गत ५० ते ६० वर्षात जेवढे निसर्गाचे नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करणे हि काळाची गरज असल्याचे शिवशंकर चापुले आवर्जुन सांगतात.

तीळ संक्रांत ला बीज वाण 

नवीन वर्षातील पहिला सण असतो तो तिळसक्रांतचा. या सणाच्या निमित्याने  चापुले दाम्पत्य छोट्या पाऊच मध्ये दुर्मिळ बीज टाकून ते वाण भेट म्हणून देतात. या निमित्याने अनेक कुटुंबानी त्यांच्या घरी शेतात दुर्मिळ वनस्पतीचे संगोपन करावे व निसर्ग संवर्धनात हातभार लावावा हा त्यामागील उद्देश असल्याचे शिवशंकर भाऊ व त्यांच्या धर्मपत्नी सांगतात.

laksh

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close