सिपना पटेल

सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील हतरु,जारीदा हे नाव घेतले तर अनेकांच्या नजरे समोर येतो अती दुर्गम परिसर. याच हतरु परिसरातील खळखळ वाहणाऱ्या खंडू नदीच्या पात्रालगत मेळघाटातील सर्वात जुने व सर्वात मोठे गोलाई असलेले साग या जातीचे वृक्ष मोठ्या डौलाने उभे आहे. या वृक्षाचे वय सुमारे १५० वर्षापेक्षा अधिक आहे. याचा घेर सुमारे १४ फुट एवढा आहे. कोरकू जमातीत व एकूणच मेळघाटात नामांकित किंवा प्रमुख असणाऱ्या व्यक्तीला पटेल असं मानाने म्हटलं जाते. सागाला मेळघाटात सिपना असे म्हणतात. गावातील प्रमुख व्यक्तीला जसे लोक पटेल म्हणून संबोधतात अगदी तसेच साग या वृक्षातील सर्वात मोठे व जुने वृक्ष असल्याने याला ‘सिपना पटेल’ असे नामकरण केले आहे.
निसर्ग पूजक आदिवासी :-
आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असल्याने येथील स्थानिक पक्षी,प्राणी,वनस्पती आदी निसर्गातील प्रत्येक घटक हा या लोकांसाठी मानाचा असतो. येथील वाघांचे सुद्धा येथे मंदिर बघायला मिळते .प्रेमाने येथील लोकं वाघाला हे कुला मामा संबोधतात तसेच सागा सारख्या वनस्पतीला देखील हे पूजतात. सिपना पटेल वृक्षाची सुद्धा येथे पूजा केली जाते.येथे त्रिशूल व शेंदूर लावलेले दगडांचे देव बघायला मिळतात.या ठिकाणी अनेक आदिवासी बांधव वनभोजन व देवाचे भोजन सुद्धा ठेवतात.
वृक्षप्रेमी साठी अभ्यासाचा विषय :-
सुमारे दीडशे वर्षापूर्वी संपूर्ण भारतात इंग्रजांचे शासन होते. इंग्रज शासनातील अनेक बडे अधिकारी हे वन्यप्रेमी होते. त्यामुळे त्यांनी जंगला सोबत रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. वेगवेगळे जंगल,प्राणी, याबाबत लेखनाची सुरुवात त्यांनीच केली. आजही अनेक अभ्यासक त्यांच्या लेखनाचा आधार घेतात. मेळघाटातील वनस्पती बाबत वनस्पती तज्ञ एम.ए.ढोरे यांनी विपुल प्रमाणात संशोधन पर लेखन केले आहे. मेळघाटातील सिपना पटेल या वृक्षाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक वृक्षप्रेमी तथा संशोधक या वृक्षाच्या भेटीसाठी हतरु वन्य परीक्षेत्राला भेट देतात.
अनमोल साग :-
सागवान हे भारत, म्यानमार व थायलंडचे वृक्ष आहे. भारताच्या उत्तरेकडे सागाचे जंगल मोठ्या प्रमाणात आहे. पुरेसा सूर्यप्रकाश आणि उष्णकटिमध्ये हवामान हे सागाच्या वाढिसाठी उपयुक्त ठरते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सुमारे लाखो वृक्ष बघायला मिळतात. जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुलांचा हंगाम असतो. घराच्या बांधकामासाठी तसेच फर्निचर साठी सागवान लाकूड अतिशय उपयुक्त असल्याने याला मोठी मागणी आहे. शिवाय हे झाड अधिक काळ टिकणारे असल्याने या झाडाच्या वृक्षाला बाजारात मोठी मागणी आहे.मेळघाटात हे वृक्ष सर्वत्र असल्याने अनेकांच्या घराला, संरक्षक भिंत, गोठा आदी सर्वच बाबतीत सागाचा वापर दिसुन येतो.
सिपना पटेल चर्चेचा विषय :
सर्वात मोठे ,सर्वात उंच,सर्वात मोठा घेर ,सर्वात जास्त आयुर्मान असलेले सिपना पटेल हे वृक्ष नेमके कसे आहे. हे बघण्यासाठी पर्यटक, वृक्षप्रेमी, अभ्यासक मोठी पायपीट करतात. यामुळेच सिपना पटेल हे परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.